२० नोव्हेंबर २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ऑनलाईन ड्रेसची ऑर्डर केल्यानंतर वेगवेगळ्या प्रोसेससाठी 99 हजार 600 रुपये स्वीकारून विद्यार्थिनीची फसवणूक केल्याची घटना शहरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही 23 वर्षीय विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले असून, फिर्यादी ही घरी असताना इन्स्टाग्रामवरील रील स्क्रोल करीत होती. त्यावेळी फिर्यादीच्या पेजवर ड्रेसची रील दिसली. त्यानंतर या ड्रेसचा स्क्रीनशॉट घेऊन त्याच्या फॅशनिस्ट अल्टिक लेडी या इन्स्टाग्रामवर त्यांना मेसेज केला. त्यानंतर आरोपींनी ड्रेसविषयी माहिती दिली. या ड्रेसची किंमत 600 रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने या ड्रेसची ऑर्डर दिली. ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला क्यूआर कोड पाठविला. त्यावर फिर्यादीने स्वत:चा फोन पे क्रमांक त्याच दिवशी करून त्यावर 600 रुपये ऑनलाईन पाठविले. त्यावर फिर्यादीने ऑर्डर किती दिवसांत येईल, असा मेसेज केला असता आरोपींनी तीन ते चार दिवसांमध्ये ड्रेस मिळेल, असे सांगितले.
त्यानंतर संशयितांनी पीडितेला ड्रेसच्या ऑर्डरचा कन्फर्मेशन मेसेज पाठविला. त्यानंतर संबंधित क्रमांकावरून फिर्यादीला फोन आला. त्यावरून एक पुरुष बोलत असल्याचे लक्षात आले. त्याने फोनवर सांगितले, की आप का ऑर्डर आप को आज मिल जायेगा; लेकिन यह नॅशनल ऑर्डर है, इसलिए आप को 1 हजार 999 रुपये पे करना पडेगा. त्यावर फिर्यादीने हे पैसे दिले तर रिफंड होतील का, असे विचारले असता पलीकडून “हो,” असे उत्तर आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पुन्हा एक मेसेज केला. त्यानंतर फियार्दीने ऑर्डर रद्द करण्यासाठी त्याच नंबरवर कॉल केला आणि पैसे परत करण्यास सांगितले. ऑर्डर रद्द करण्यासाठी पुन्हा ही प्रोसेस करावी लागेल असे समोरच्याने सांगितले.
त्यावेळी तिने 4998 रूपये फोन पे द्वारे पाठवले. त्यानंतर त्याने सांगितले की तुम्हाला फक्त 2999 रुपये पाठवायचे होते. म्हणून तिने पुन्हा 3000 रुपये पाठवले. 1 रुपया जास्त आला असे सांगून 2999 रूपयेच पाठवा असे सांगितले. पुन्हा तिला 2999 रुपये भरण्यास भाग पाडले. अशा तर्हेने वेगवेगळ्या पद्धतींनी ड्रेसची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी फिर्यादीला मेसेज करून एकूण 99 हजार 605 रुपये स्वीकारूनही ड्रेस येत नसल्याने फिर्यादीला शंका आली. आपली फसवणुक झाल्याचे समजताच तिने त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात या भामट्यांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी नडविनकेरी करीत आहेत.
Copyright ©2026 Bhramar