मध्यरात्रीच्या सुमारास दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घालत गोंधळ निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर या तरुणांनी थेट पोलीस अधिकाऱ्यासोबतच गैरवर्तन केल्याने प्रकरण चांगलंच तापलं. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांवर कारवाई केली. नेमका काय घडला हा प्रकार? जाणून घेऊया...
दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या दोन तरुणांनी चक्क पोलिसांलाच धक्काबुक्की केली. हे तरुण दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालत होते. पोलिसांनी त्यांना असं करण्यास मनाई केल्याचा राग या तरुणांना आला. यानंतर या दोघांनी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई यांच्याशीच झटापट केली. याप्रकरणी दोन्ही तरुणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे.
अजय जयकुमार सावंत (वय ३५) आणि किसन सूर्यभान झेंडे (वय ३२, दोघे रा. बायफ रस्ता, वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यां तरुणांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी खराडी पोलिसांचे पथक रात्रपाळीत गस्त घालत होतं. त्यावेळी टेक्सास टॉवर सोसायटीसमोर सावंत आणि झेंडे हे दोन तरुण दारूच्या नशेत गोंधळ घालत होते. हे दृश्य पाहू पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना गोंधळ घालू नका, असं सांगितलं. मात्र, नशेत असलेल्या या तरुणांना याचा राग आला.
रागात या दोघांनी पोलीस उपनिरीक्षक म्हत्रे आणि पोलीस शिपाई केदार यांना धक्काबुक्की केली. या झटापतीत केदार यांच्या गणवेशाचे बटणही तुटले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अशोक केदार यांनी खराडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकरणी दोघाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.