लग्नसमारंभ म्हटलं की पाहुण्यांची गर्दी, पंचपक्वान्नांची मेजवानी आणि थाटामाटाचा सोहळा आलाच! मात्र, आता लग्नातील जेवणाच्या नियोजनाची माहिती प्रशासनाला द्यावी लागणार आहे. पाहुण्यांची संख्या किती, जेवणाचा मेन्यू काय आणि केटरर कोण, याचा तपशील अन्न व औषध प्रशासनाला कळवावा लागणार आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने तुकाराम मुंढे यांनी नियमांच्या अंमलबजावणीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे लग्नसमारंभ आयोजक आणि केटरिंग व्यावसायिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
राज्यात तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार हातात घेतल्यापासून हे खाते प्रचंड चर्चेत आले आहे. विभागाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. बेकायदेशीर औषध विक्रीपासून ते अन्नपदार्थांच्या गुणवत्तेपर्यंत अनेक मुद्द्यांवर विभागाकडून कारवाया केल्या जात आहेत. अनेक कारवायांचं सत्रही सुरुच आहे. याच सगळ्या घडामोडींदरम्यान आता अन्न व औषध प्रशासन विभागाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या सुरक्षेप्रती विभाग किती सतर्क आहे, याचा प्रत्यय येतो आहे. एफडीएचा हा निर्णय सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.
या निर्णयानुसार आता तुमच्या घरात लग्न समारंभ असेल आणि जेवण्याची व्यवस्था असेल तर तुम्हाला FDA विभागाला या बाबतची माहिती देणं बंधनकारक असणार आहे. एवढंच नाही तर किती लोक जेवणार आहेत, काय पदार्थ असणार आहेत, आणि कोण केटरर्स असणार आहे, याचा सर्व प्रकारचा तपशील तुम्हाला FDA विभागाला देणं बंधनकारक असणार आहे. एफडीएच्या या मोठ्या निर्णयामागचं कारण म्हणजे, लग्नसमारंभात जेवणामुळे होणाऱ्या विषबाधांच्या घटनांवर अंकुश मिळवणं आहे. त्यामुळे आता हा निर्णय सध्या राज्यभर चर्चेमध्ये आला आहे.
दरम्यान, FDA विभागाकडून राज्यभरात सुरू असलेल्या कारवायांची आकडेवारीही समोर आली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये विभागाने तब्बल 1,986 तपासण्या केल्या असून, या महिन्यात 544 नियामक कारवाया सुरू केल्या आहेत. औषध उत्पादन युनिट्समध्ये 292 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 17 उत्पादन परवाने रद्द, तर 55 परवाने निलंबित करण्यात आले. किरकोळ आणि घाऊक औषध विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या 1,694 तपासण्या करण्यात आल्या. यावेळी 105 परवाने रद्द आणि 367 परवाने निलंबित करण्यात आले.