येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे
जिथे संपूर्ण राज्य आणि देश दिवाळीच्या आनंदात न्हाऊन निघालाय, घराघरांमध्ये दिव्यांची रोषणाई आणि फराळाची तयारी सुरू आहे... त्याच महाराष्ट्रातल्या एका बळीराजाच्या घरात मात्र अंधार पसरलाय. नाशिकच्या येवला तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
येवला तालुक्यातील पारेगाव येथील अशोक लक्ष्मण खिल्लारे या ४५ वर्षीय शेतकऱ्याने, ऐन दिवाळीच्या तोंडावर राहत्या घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सततची नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव आणि डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर यामुळे हे शेतकरी तीव्र आर्थिक विवंचनेत होते.
'सण कसा साजरा करायचा? मुलांचे पोट कसे भरायचे आणि डोक्यावरचे कर्ज कसे फेडायचे?' या चिंतेने त्यांना इतके ग्रासले की त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेमुळे पारेगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजा माणसाच्या पोसणाऱ्या बळीराजावर आज ही वेळ का येतेय? शासनाच्या पोकळ घोषणा आणि मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या या बळीराजाला नेमका कधी न्याय मिळणार? हाच आता मोठा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत."