देशभरातील राजकारणात सध्या मोठया हालचाली सुरु असून आता पंजाबच्या राजकारणात मोठी खलबत निमार्ण झाली आहे . पंजाबमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पक्षाच्या २ विद्यमान आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर आता पुन्हा सलग दुसऱ्यादिवशी आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पक्षाने आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही वेळातच हे राजीनामे समोर आले आहेत. त्यामुळे पक्षामध्ये असलेली नाराजी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
चेतन सिंह जौडामाजरा आणि हरमीत सिंह पठाणमाजरा यांच्या नंतर पंजाबच्या आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनीही विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विजय यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून त्यांनी आपण आमदारकीच्या काळात केलेल्या कामांबद्दल माहिती दिली.
विजय प्रताप यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील सुमारे ९० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. तसेच पावलोपावली जनतेला महत्त्व दिल्याचे त्यांनी म्हटले. विधानसभेत अमृतसरमधील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सर्किट हाऊस, कंपनी बाग आणि इतर स्थानिक प्रश्नांवर आपण सातत्याने आवाज उठवल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय गुरु नानक देव विद्यापीठ, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि बरगारी येथील धार्मिक ग्रंथाच्या अवमानाच्या घटनेबाबतही आपण प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत कुंवर विजय प्रताप सिंह यांचे नाव नव्हते. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट विधान केलेले नाही. दरम्यान, याआधी चेतन सिंह जौडामाजरा आणि हरमीत सिंह पठाणमाजरा यांनीही आम आदमी पक्षाला रामराम केला आहे. चेतन सिंह हे समाना मतदारसंघाचे, तर हरमीत सिंह हे सनौर मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. निवडणुकीला अजून वेळ असतानाच तीन आमदारांनी पक्षाची साथ सोडल्याने पंजाबमध्ये आम आदमी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.