अलीकडे अपघातांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून या नेक भीषण अपघातांच्या घटना समोर येत आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीतील शिंदे गावात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात कामावर जाणाऱ्या दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गावातील भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी हा अपघात झाला. सकाळी कामावर जाणाऱ्या दोन तरुणांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही बिगारी कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कंटेनर आणि इतर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.