महाराष्ट्रातील शाळांच्या दिवाळी सुट्टीबाबत शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून, सुट्टी कधीपासून सुरू होणार आणि शाळा पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्ट्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि विविध सुट्ट्यांबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केलंय. यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीची दीर्घ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या २ नोव्हेंबर २०२६ पासून मिळणार असून, सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.
माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सत्रांची रचना स्पष्ट करण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र हे सोमवार, १५ जून २०२६ पासून सुरू झाले असून ते शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहील.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी दिवाळीची सुट्टी सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. या कालावधीत दिवाळी सणाचे विविध दिवस जसे की धनत्रयोदशी (६ नोव्हेंबर), दिवाळी पाडवा/बलिप्रतिपदा (१० नोव्हेंबर) आणि भाऊबीज (११ नोव्हेंबर) या सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्यांचा समावेश असेन.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होतील. द्वितीय सत्र हे १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर सोमवार, ३ मे २०२७ ते सोमवार, १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहील. दरम्यान माध्यमिक शाळा संहितेनुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आलेत.