अनैतिक संबंधातून होणारे वाद आणि घडणारे गुन्हे या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
देहरादूनच्या प्रेमनगर परिसरातील एका जंगलात काही दिवसांपूर्वी एक मृतदेह आढळला आणि पोलिसांसमोर एका रहस्यमय हत्येचे कोडे उभे राहिले. सुरुवातीला हा प्रकार नेमका कसा घडला, याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. मात्र, तपासाची चक्रे फिरली आणि या हत्येमागे गूढ उकललं. एका मोबाइलमधील फोटो-व्हिडिओंमुळे एका माणसाला संपवण्यात आलं होतं.
पत्नीचे लल्लनसोबत अनैतिक संबंध
मृत व्यक्तीचे नाव मदन मुखिया असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान मदनच्या पत्नीचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या लल्लन शर्मासोबत कथित संबंध असल्याची माहिती समोर आले आहे. हे संबंध गेल्या काही काळापासून सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
कथित संबंधांचा संशय मदनला आला होता. मदन आणि लल्लन यांच्यात चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांसोबत चांगलं बोलायचे. परंतु पोलिसांच्या तपासानुसार, मदनने एकदा लल्लनचा मोबाइल पाहिला आणि त्यात त्याला आपल्या पत्नीशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ आढळले. यानंतर मदनचा त्याच्या पत्नीसोबतचा वाद वाढला. मदनला आपली पत्नी आणि लल्लन यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे समजले होते.
याच टप्प्यावर परिस्थितीने गंभीर वळण घेतले. आपले बिंग फुटू शकते तसेच आपल्या प्रेमसंबंधात मदन अडथळा ठरू शकतो हे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या माहितीनुसार, मदनला दारू पिण्याच्या बहाण्याने जंगलाच्या परिसरात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलातील एका खड्ड्यात टाकण्यात आला.
मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासोबतच CCTV फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. संशयाची सुई लल्लनकडे वळल्यानंतर लल्लनची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मदनच्या पत्नीची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आली.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अखेर पोलिसांनी मदनच्या पत्नीला आणि लल्लन शर्माला अटक केली. मोबाइलमधील कथित फोटो-व्हिडिओपासून सुरू झालेला संशय, वाढलेला वैवाहिक संघर्ष आणि त्यानंतर घडलेली हत्या अशा घटनाक्रमाने या प्रकरणाला धक्कादायक वळण दिले आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यामागील कारणांचा पुढील तपास सुरू आहे.