बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळामुळे देशातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काही भागांत पावसाचे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ वेगाने किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ आज दुपारपर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर गोपाळपूरजवळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. हे वादळ उत्तर दिशेने पुढे जात असून नरसापूर ते ओडिशातील पुरी या किनारपट्टीच्या दरम्यान गोपाळपूरजवळ धडकण्याचा अंदाज आहे. किनाऱ्यावर पोहोचताना वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर असू शकतो.
या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण आणि मध्य भारतातील काही राज्यांमध्ये दिसून येऊ शकतो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, रायलसीमा आणि मध्य प्रदेशात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.