कार्तिकी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज झाली असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष बससेवेबाबत मोठी घोषणा केली आहे.
पंढरपूरमध्ये 21 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देवस्थान समितीसह प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त आता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या १ हजार जादा बसेस सोडण्याचा मोठा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाचा सर्वात मोठा निर्णय..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने जोरदार तयारी सुरु केली आहे. कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या १ हजार जादा बसेस सज्ज झाल्या असून भाविकांच्या सोयीसाठी राज्यभरातून सुमारे १ हजार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. दर्शनानंतर परतीच्या प्रवासासाठीही चंद्रभागा बसस्थानकातून विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ज्यादा बसेसद्वारे ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या मोठया निर्णयामुळे पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. त्यामुळेच भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित प्रवाससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात भाविकांचा महापूर…
महाराष्ट्र, कर्नाटक, तसेच गोवा राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल होतात. भाविकांच्या गर्दीने चंद्रभागेच्या तरी भक्ती, श्रद्धेचा अलौकिक सोहळा पाहायला मिळतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापुजा करणार आहेत. यासंबंधी त्यांनी पंढरपुर दौरा करत तयारीचा आढावाही घेतला होता.