अखेर महाराष्ट्रात थंडीने जोर धरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उकाडा कमी होत असून राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा घसरू लागला आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागांतही गारव्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत थंडीचा जोर किती वाढणार आणि तुमच्या शहरात तापमान किती राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तिथे पारा थेट खाली घसरल्याने सकाळी आणि रात्री चांगलाच गारठा जाणवत आहे. तसेच जळगाव आणि नाशिक परिसरातही किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे.
निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत असून, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा थेट ११.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. नाशिक शहरासह जळगाव आणि धुळे परिसरातही किमान तापमान १२ ते १४ अंशांच्या दरम्यान आले आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत असून नागरिकांना स्वेटर व शाल बाहेर काढावे लागत आहेत दिवसाचे तापमान महाराष्ट्रातील अनेक शहरातील अजूनही ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने दुपारी चटका जाणवत आहे. तर दुसरीकडे रात्री ११ नंतर किमान तापमानात वेगाने घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण होतो. दिवसा कडक ऊन आणि रात्री गार हवा अशा या दोन प्रकारच्या तीव्र हवामानामुळे संमिश्र ऋतू अनुभवता येत
कसा राहील पुढील काही दिवसांचा अंदाज? हवामान तज्ज्ञांच्या मते, हवेच्या दाबातील बदलांमुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी-जास्त होत राहील. काही दिवस हवेचे दाब वाढल्यामुळे थंडीची जास्तीची तीव्रता जाणवेल, तर काही दिवस दाब कमी झाल्याने गारठा थोडा मंदावल्यासारखा वाटेल. सध्या राज्यातील बहुतांश भागांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून असल्यामुळे पहाटेच्या वेळी हलका गारवा आणि सुखद वातावरण अनुभवायला मिळत आहे.