रात्रीची शांत वेळ आणि नागरिक झोपेच्या तयारीत असतानाच अचानक जमीन हादरली. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांसाठी नागरिकांची एकच धावपळ उडाली. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड परिसरात सोमवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
रात्री उशिरा अचानक जमीन हादरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी या संस्थेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती दिली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी किश्तवाड परिसरात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.१ इतकी नोंदवण्यात आली. जमिनीपासून सुमारे ५ किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरे जाणवले नाहीत. तसेच या घटनेमुळे घरे, इमारतीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाकडूनही सध्या कोणत्याही मोठ्या नुकसानीची माहिती देण्यात आलेली नाही. भूकंप किती शक्तिशाली आहे, हे रिश्टर स्केलने मोजले जाते. या स्केलवर भूकंपाची तीव्रता जितकी जास्त असते, तितकी त्याची ताकद अधिक असते. २ किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप सूक्ष्म स्वरूपाचे मानले जातात. असे भूकंप अनेकदा लोकांना जाणवतही नाहीत.
३ ते ४ तीव्रतेचे भूकंप तुलनेने सौम्य असतात. मात्र, त्यांचे धक्के काही भागांमध्ये जाणवू शकतात. ४.५ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपामुळे कमकुवत इमारती आणि घरांचे नुकसान होण्याची शक्यता असते. तर ७ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप अत्यंत शक्तिशाली मानले जातात. अशा भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. दरम्यान, किश्तवाडमध्ये झालेल्या ३.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे सध्या कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. तरीही भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जाणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.