लहान मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमुरडीच्या डोक्यात दगड आणि कुंडी घालून तिला फरफटत नेल्याची धक्कादायक दृश्ये CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, लहान मुलांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकी ही घटना काय आहे, पाहूया सविस्तर.
हरियाणातील पंचकुला येथून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. सेक्टर 20 मधील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने KG मध्ये शिकणाऱ्या चिमूरडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने चिमूरडीवर दगड आणि कुंडीने हल्ला केला. यामध्ये चिमूरडी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारांसाठी पंचकुला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी चंदीगडमधील PGI रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बेशुद्ध झाल्यानंतरही हल्ला सुरूच ठेवला मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या आवारात ही घटना घडली. विद्यार्थ्याने सुरुवातील चिमूरडीवर दगडांनी हल्ला केला. त्यानंतर कुंडी उचलून तिच्या डोक्यात टाकली. ही लहानगी बेशुद्ध झाल्यानंतरही विद्यार्थ्याने तिला सोडले नाही. त्याने तिला काही वेळ फरफटत नेले आणि दगडांनी मारहाण सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर जखमी चिमुरडीला तातडीने पंचकुला येथील सेक्टर-6 मधील नागरिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला चंदीगडमधील PGI रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सेक्टर-20 पोलीस ठाण्याचे प्रभारी यशदीप आणि तपास अधिकारी प्रदीप कुमार पोलीस पथकासह शाळेत दाखल झाले. पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाकडून घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आई-वडिलांचीही चौकशी केली जात आहे. एवढ्या लहान वयातील विद्यार्थी असे कृत्य करू कसे शकतो याचा तपास पोलीस करत आहेत.
तर हरियाणाची घटना ताजी असतानाच तिकडे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू येथे शाळेच्या वर्गात घुसून एका व्यक्तीने १५ वर्षीय विद्यार्थिनीवर चेनसॉ मशीनने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी ३१ ऑक्टोबरला जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. या हल्ल्यात दहावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणारी आणखी एक विद्यार्थिनीही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा जखमी विद्यार्थिनीचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.