नाशिक शहरातुन एक अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. एका इंजिनीअर तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील दातीर नगर परिसरात एका २८ वर्षीय तरुण इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना आहे. पवन राजेंद्र पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, तो काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणींसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पवन हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी होता. त्याचे वडील राजेंद्र भगवंतराव देसले पाटील हे शिक्षक आहेत. पवनने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नाशिकच्या एका नामांकित कंपनीत नोकरीवर रुजू झाला. मात्र, काही दिवसानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पवनची एका तरुणीशी मैत्री होती. पवन नाशिकला येताच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. संबंधित तरुणीने त्याचा फोन उचलत नव्हती. तसेच ती त्याच्या संपर्कात येण्याचे टाळायची. यामुळे तो मानसिक तणावाखाली होता, असा आरोप आहे. तसेच, त्याने संबंधित तरुणीला मोठी रक्कम दिली होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पवन काही दिवसांसाठी गावी गेला असताना त्याच्या वागण्यात झालेला बदल कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने काही व्यक्तींकडून मारहाण आणि धमक्या मिळाल्याचे सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. जयदीप पाटील आणि हेमंत जाधव यांच्यासह काही जणांकडून त्रास दिला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पवनने नाशिकमधील दातीर नगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे आणि त्यांच्याकडून झालेल्या कथित त्रासाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.
पवनच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तरुणी, जयदीप पाटील आणि हेमंत जाधव या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि धमकावणेसाठी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लाड या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, चिठ्ठीतील मजकूर आणि तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे.