नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):-दत्त मंदिर रोड परिसरात पाच वर्षांच्या मुलीला गाडीतून आलेल्या चार ते पाच जणांनी जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने गुरुवारी दुपारी नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली. मुलीला घेऊन संशयितांची गाडी भरधाव वेगाने निघून गेल्याने सुरुवातीला अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण झाला. आरडाओरड झाल्यानंतर नागरिकांनी त्याच्या सोबत गाडीत आलेल्या एका इसमाला पकडून त्याला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीच्या शोधासाठी गाडीच्या दिशेने अलर्ट जारी केला. मात्र, तपास पुढे सरकताच या घटनेमागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर रोड परिसरात मुलीचे आजी-आजोबा राहतात. मुलीची आई कौटुंबिक वादामुळे गेल्या महिनाभरापासून मुलांसह माहेरी आली आहे. मुलीचे वडील सिल्वासा येथील रहिवासी असून ते उद्योजक असल्याचे समजते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पाच वर्षांच्या मुलीचा आज वाढदिवस असल्याने तिचे वडील काही व्यक्तींसह नाशिक रोड येथे आले होते. मुलीला भेटणे किंवा तिला सोबत सिल्वासा येथे घेऊन जाणे, हा त्यांचा उद्देश असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली. मात्र, मुलीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नावेळी परिसरात अचानक आरडाओरड झाल्याने नागरिक जमा झाले. त्यामुळे काही काळ परिस्थिती चिघळली.
यावेळी मुलीच्या वडिलांसोबत असलेल्या एका इसमाला नागरिकांनी पकडले आणि त्याला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुलीला घेऊन गाडी निघून गेल्याने सुरुवातीला पोलिसांनीही प्रकरण गांभीर्याने घेतले. अपहरणाची शक्यता लक्षात घेऊन गाडी ज्या दिशेने गेली त्या मार्गावर तत्काळ अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, पोलिसांनी संबंधितांकडून माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मुलीचे वडीलच तिला भेटण्यासाठी नाशिक रोड येथे आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे सुरुवातीला निर्माण झालेला अपहरणाचा संशय कमी झाला.
मुलीचे आई-वडील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पत्नी मुलांना घेऊन गेल्या महिन्यापासून नाशिक रोड येथे माहेरी राहत आहे. मुलीचा वाढदिवस असल्याने वडील तिला भेटण्यासाठी आले होते की तिला सिल्वासा येथे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
“हा कौटुंबिक वादाचा विषय आहे. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी माहिती उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली.या घटनेमुळे काही काळ नाशिक रोड परिसरात अपहरणाची अफवा आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून, संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे.