संतापजनक ! कॉलेजच्या नाईट पार्टीत तरुणीवर अत्याचार ; नेमकं काय घडलं ?
संतापजनक ! कॉलेजच्या नाईट पार्टीत तरुणीवर अत्याचार ; नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More

मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली असून कॉलेजच्या नाईट पार्टीत एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी छत्तीसगडमध्ये कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मढ आयलंड परिसरात कॉलेज विद्यार्थ्यांच्या नाईट पार्टीदरम्यान तरुणीवर लैंगिक अत्याचाराची ही घटना घडली आहे.  पार्टीदरम्यान तरुणीच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले. बेशुद्धावस्थेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीला छत्तीसगडमधून अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबई हादरली.

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील एका नामांकित कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या ग्रुपने २९ ऑक्टोबर रोजी मढ आयलंड परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये नाईट पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये पीडित तरुणीदेखील सहभागी झाली होती. यावेळी आरोपीने तरुणीच्या ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळल्याचा आरोप आहे. हे पेय प्यायल्यानंतर तरुणीला गुंगी येऊ लागली आणि ती शुद्ध हरपण्याच्या अवस्थेत गेली. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस - या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तिला सोबत घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. घटना मढ आयलंड परिसरात घडल्याने मालवणी पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली. पुढील तपासासाठी हे प्रकरण जुहू पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले.

छत्तीसगडमधून आरोपीला अटक - गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी मुंबईतून फरार झाला होता. तो छत्तीसगडमधील आपल्या मूळ गावी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक तपास आणि सर्व्हेलन्सच्या आधारे जुहू पोलिसांच्या पथकाने छत्तीसगडमध्ये छापा टाकून आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील एफआयआरमध्ये आणखी एका संशयिताचे नाव समोर आले आहे. मात्र, संबंधित व्यक्तीचा अत्याचाराच्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group