२८ दिवसांचा शोध संपला ! बेपत्ता महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; डीएनए चाचणीतून पटविणार ओळख
२८ दिवसांचा शोध संपला ! बेपत्ता महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; डीएनए चाचणीतून पटविणार ओळख
img
Nandini khandare More
गेल्या २८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता महिलेची ओळख पटविणे कठीण झाले असून, आता डीएनए चाचणीच्या माध्यमातून तिची ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार , हिंगणा तालुक्यातील देवळी-पेंढरीच्या शिवारातील शेतात मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा मृतदेह २८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मीना तेलंग नामक महिलेचा असावा, अशी शक्यता नागरिकांसह पोलिसांनी व्यक्त केली आहे. ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी स्पष्ट केले.

काही नागरिकांना देवळी-पेंढरी शिवारातील शेतात हा मृतदेह आढळून आला. त्यांनी स्थानिक पोलिस पाटलामार्फत हिंगणा पोलिसांना कळविले. ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये पाठविला. मृतदेह बराचसा कुजलेला असल्याने तसेच चेहरा स्पष्ट ओळखता येत नसल्याने मृत महिलेची ओळख पटू शकली नाही.

अंगावरील कपड्यांवरून अंदाज व्यक्त अंगावरील कपड्यांवरून हा मृतदेह बाली ऊर्फ मीना रणवीर तेलंग (४३) हिचा असावा, अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत योग्य तपासाच्या दृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

६ ऑक्टोबरच्या रात्री मीना व तिच्या पतीमध्ये एका व्यक्तीसोबत बोलण्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर पती रणवीर हॉलमध्ये बसला तर मीना स्वयंपाकघरात गेली. काही वेळाने ती कुणाचेही लक्ष नसताना घरातून निघून गेली. रणवीरने परिसरात शोध घेतला असता, ती कुठेही आढळून न आल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार ७ ऑक्टोबरला हिंगणा पोलिस ठाण्यात नोंदविली होती.

इतर बातम्या
Join Whatsapp Group