देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. चक्रीवादळ मुरासूचा प्रभाव कमी झाला असला तरी त्याच्या उर्वरित हवामान प्रणालीमुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. आज, ५ नोव्हेंबर रोजी देशातील विविध भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि ओडिशासह अनेक राज्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळानंतर आता देशाला मुरासू चक्रीवादळाचा धोका आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आता देशभरातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. चक्रीवादळाचा उर्वरित भाग आता पूर्व तेलंगणा आणि लगतच्या किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशवर कमी दाबाच्या क्षेत्रात आहे. याचा परिणाम केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित राहणार नाही तर देशातील १५ राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. आज या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशसह १५ राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटरपर्यंत असू शकतो. दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील जोरादर पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज अनेक राज्यांमध्ये तापमानही कमी होऊ शकते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज डोंगराळ राज्यांमध्ये पावसासोबत हिमवृष्टी देखील होऊ शकतो. काही भागांमध्ये भूस्खलनाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. पूर्व भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरातील जोरदार वाऱ्यांचा परिणाम पूर्वेकडील राज्यांमधील हवामानावरही होण्याचा अंदाज आहे. पुढीच्या ३ दिवसांत उत्तर भारतातील तापमानात बदल होईल. १० पेक्षा जास्त राज्यांमध्ये पारा ४ ते ५ अंशांनी खाली येऊ शकतो.