देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांवर काळाने अचानक घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवाच्या दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या भाविकांचा प्रवास काही क्षणांतच मृत्यूच्या दरीत संपला. प्रवासादरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित कार थेट नदीत कोसळली. या भीषण अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समोर आलेलया माहितीनुसार , उत्तराखंडमध्ये भाविकांवर काळाने घाला घातला. गंगोत्री धामला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार नदीत कोसळली. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे तर दोघे जण बेपत्ता आहेत. गुरुवारी सकाळी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगाननीजवळ हा अपघात झाला. कार अनियंत्रित होऊन भागीरथी नदीत कोसळली. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगानीजवळ ७ जणांना घेऊन जाणारी कार भागीरथी नदीत कोसळली. अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट २०० मीटर खोल दरीत कोसळून नदीत पडली. अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले भाविक गुजरातचे रहिवासी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवासी गुजरातच्या साबरमती भागातील रहिवासी असून ते उत्तरकाशीहून गंगोत्री धामला दर्शनासाठी जात असताना ही अपघाताची घटना घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेतला जात आहे. अपघातामध्ये १ जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस, एसडीआरएफ आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. मदत आणि बचाव पथकाकडून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेतला जात आहे. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. पोलीस आणि एसडीआरएफची पथके नदीकाठावर आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम करत आहेत. अपघातामध्ये अशोकभाई पटेल, रुतिका अशोकभाई पटेल, घनश्यामभाई सरवालिया, सुरेंद्र सिंग यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये वेदांत अशोकभाई पटेल गंभीर जखमी झाला आहे. तर सुधाबेन अशोकभाई पटेल आणि किरणबेन विशालभाई पटेल हे बेपत्ता आहेत.