सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी! त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते धर्मध्वजारोहण
सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी! त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते धर्मध्वजारोहण
img
Nandini khandare More
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नगरी आज भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. हर हर महादेवच्या जयघोषात आणि साधू-संतांच्या उपस्थितीत धर्मध्वज फडकवत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली होती. आ

गोदावरीच्या उगमस्थानी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा शुभारंभ शनिवारी धर्मध्वजारोहणाने झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, प्रमुख पदाधिकारी आणि संत-महंत उपस्थित होते.

धर्मध्वजारोहणाच्या निमित्ताने विविध आखाड्यांचे प्रमुख संत-महंत त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री आणि आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरि गिरी, निरंजनी आखाड्याचे सचिव श्रीमहंत रवींद्र पुरी, आवाहन आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत सत्य गिरी, बडा उदासीन आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास, आनंद आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, निर्मल आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत देवेंद्रजी आणि नया उदासीन आखाड्याचे श्रीमहंत भगत रामजी यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रतिनिधी या सोहळ्यात सहभागी झाले.

पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या सौजन्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धर्मध्वजारोहणानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुपारी सुमारे तीन वाजता कुशावर्त तीर्थावर पूजा-अर्चा करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने धर्मध्वजारोहण हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. संत-महंत आणि नागा साधूंचे अमृतस्नान २०२७ मध्ये होणार असून, ज्योतिषीय गणनेनुसार पहिले अमृतस्नान १२ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group