एका पित्याने आपल्या मुलीची थरारक हत्या केली असल्याची घटना घडली आहे. या घटनेंन निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे एका पित्यानेच आपल्या ३५ वर्षीय विवाहित मुलीचा गळा आवळून हत्या केली. मुलीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आणि समाजात बदनामी झाल्याच्या रागातून वडिलांनीच हे टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, हत्येनंतर मृतदेह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अस्थीविसर्जनही उरकण्यात आले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.
आरोपीची ३५ वर्षीय विवाहित मुलगी मागील काही महिन्यांपासून माहेरीच राहत होती. २०१६ मध्ये तिचा विवाह हिंगोली जिल्ह्यातील तरुणाशी झाला होता आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, मागील एक-दीड वर्षापासून तिचं तिच्या पतीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध होते याची कल्पना तिच्या वडीलांना मिळाली. वडिलांनी वारंवार समजूत काढूनही ती ऐकत नव्हती. तरीही दसऱ्याच्या काही दिवस आधी ती आपल्या प्रियकराला जाऊन भेटली होती.
समाजात आपली बदनामी झाल्याच्या रागातून आरोपीने २० ऑक्टोबरच्या रात्री शेल्याने गळा आवळून मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलगी हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावल्याचे नातेवाईकांना भासवले. घाईघाईने शेतात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले, तर दुसऱ्या दिवशी मुलगा आणि मामाच्या मदतीने जऊळका परिसरातील काटेपूर्णा नदीत अस्थीविसर्जनही केले.
या प्रकरणाची गुप्त माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत मृत मुलीचे वडीलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी हत्येची कबुली दिली. मृताच्या आईच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काटेपूर्णा नदीतून विसर्जित केलेल्या अस्थी शोधून काढल्या असून, फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुढील कायदेशीर तपास शिरपूर पोलीस करत आहेत.