पुण्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी… कारवाईच्या भीतीने उडालेली घाबरगुंडी… आणि या सगळ्या प्रकारात अवघ्या २२ वर्षांच्या इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या या तरुणासोबत नेमकं काय घडलं? त्याला ड्रग्सच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी कोणी दिली? धमकी देणाऱ्यांचा नेमका उद्देश काय होता? आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी काही धक्कादायक बाबी दडल्या आहेत का? या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, तरुणांच्या सुरक्षिततेचा आणि अशा प्रकारे धमकावून फसवणूक करण्याच्या प्रकारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाहूया, या प्रकरणाची सविस्तर माहिती.
पुणे शहरात ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्यामुळे मानसिक त्रास सहन करणाऱ्या 22 वर्षीय आयटी इंजिनियरने इमारतीच्या 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात उघडकीस आला आहे. शिखर कुमार गौरव सक्सेना असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय कुमार भाटिया आणि अजून एका व्यक्तीविरोधात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यामध्ये आयटी इंजिनिअर तरुणाने २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुण्यातील खराडी परिसरात ही घटना घडली. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्यामुळे तणावाखाली येऊन आयटी इंजिनिअरने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. शिखर कुमार गौरव सक्सेना असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. आयटी इंजिनिअरच्या आत्महत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
शिखर कुमार गौरव सक्सेना हा तरुण पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. खराडी परिसरातील रिव्हरडेल सूट या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारत त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण शिखर कुमारच्या मृत्यूमागील कारणांबाबत वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण आले. त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अजय कुमार भाटिया नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर कुमार २९ सप्टेंबरला घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यात आला पण तो सापडला नाही. तसंच त्याचा फोन बंद लागत होता. त्यानंतर त्याच्या बेपत्ता होण्याबाबत खराडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खराडी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण शिखर कुमारच्या वडिलांनी त्याच्या आत्महत्येमागचे धक्कादायक कारण सांगितले.
शिखर कुमार हा मुळचा उत्तराखंडचा होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या वडिलांनी पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजय कुमार भाटिया नावाची व्यक्ती शिखरला वारंवार फोन करून धमकी देत होता. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तो शिखरकडे पैशांची मागणी करत होता. यामुळे शिखर मानसिक तणावात होता. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.