लग्नाचं आश्वासन देऊन २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी सरपंचाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं असून परिसरात चर्चांना उधाण आलं आहे
लग्नाचे आश्वासन देऊन २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप डोहळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर करण्यात आला आहे. सचिन सिताराम घोडविंदे असे आरोप असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आन्हे गावातील रहिवासी असलेल्या सचिन घोडविंदे यांची संबंधित महिलेशी सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. याच काळात आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, भिवंडीतील करिष्मा हॉटेलमध्ये भेटल्यानंतर दोघे कल्याण येथील मेट्रो मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर डोहळे येथील एव्हेन्यु हॉटेलमध्ये मुक्काम केला. यावेळी लग्नाचे आश्वासन देऊन आपल्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच यानंतरही एव्हेन्यु हॉटेल आणि टिटवाळ्यातील फळेगाव रोडवरील जोसेफ फार्महाऊस येथे अशाच प्रकारे अत्याचार झाल्याचे तिने म्हटले आहे.
काही दिवसांनी महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने घरातील वादाचे कारण सांगून लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली. तसेच शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि हवेत गोळीबार करून घाबरवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही महिलेने म्हटले आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे यांची मदत घेतली. त्यानंतर त्यांच्या मदतीने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार सचिन घोडविंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पडघा पोलीस करीत असून, तक्रारीतील आरोपांची चौकशी सुरू आहे.