आजकाल गुन्हेगारीच्या अत्यंत भयानक आणि विश्वास न बसणाऱ्या घटना घडत असून आता गुजरातमधून एका महिलेवर झालेल्या सामूहिक अटायचाराची घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या एका विवाहित म महिलेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे गुजरात हादरले आहे. सुरेंद्रनगर येथे ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी २ महिलांसह ९ जणांना अटक केली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी आरोपी नवरा आणि त्याच्या नातेवाईकांनी महिला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण करत त्यांच्यासोबत भयानक अत्याचार केले. आरोपींनी या भयंकर कृत्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतला आणि तिच्या नवऱ्यासह ९ आरोपींना अटक केली.
पीडित महिलेचे लग्न वापी येथील एका तरुणासोबत झाले होते. पण लग्नांतर तिने नवऱ्याला सोडून दिले आणि ती चोटिला येथे राहत होती. त्याठिकाणी ती तिच्या प्रियकरासोबत ३ महिने राहिली. तिच्या नवऱ्याने तिचा शोध घेतला आणि तिला वापीला परत आणले. त्यानंतर तिला एका घरात कैद करून ठेवण्यात आले. ५ दिवसांपूर्वी पुन्हा ती पळून गेली आणि चोटिला येथे गेली होती. जेव्हा पीडित महिलेच्या नवऱ्याला कळाले की ती तिच्या प्रियकरासोबत परत पळून गेली तेव्हा त्याने आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्याच्या नातेवाईकांनी महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला. त्या दोघांना त्यांनी सुंदरनगरमधील एका घरात आणले आणि तिथे शुद्धिकरणाच्या नावाखाली त्यांच्यासोबत भयंकर कृत्य केले.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत असे सांगितले की, आरोपींनी तिला आणि तिच्या प्रियकराला सुरेंद्रनगर येथे नेले आणि ते शुद्धीकरण विधी करण्यासाठी जात असल्याचा दावा केला. त्यांनी दोघांनाही काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या प्रियकराला एका झाडाला बांधून ठेवले. तर महिलेला एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर आरोपींनी महिलेला वऱ्हांड्यात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. असाही आरोप केला जात आहे की, आरोपींनी महिलेची लवघी तिच्या प्रियकराला जबरदस्ती पाजली. हा संपूर्ण प्रकार त्यांनी मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला.