एका क्षणाचं दुर्लक्ष किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आई फोनवर बोलण्यात गुंग होती, तर दुसरीकडे चालत्या बसमध्ये चिमुकल्यासोबत असं काही घडलं की पाहणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला! या घटनेचा VIDEO सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
गुजरातच्या सूरतमधील किम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चालत्या लक्झरी बसमधून लहान मुलगा खाली पडला. मुलगा बसच्या आत खेळत असताना चालकाजवळ पोहोचला आणि अचानक दरवाज्यातून थेट रस्त्यावर पडला. ही संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चालकाने लगेचच ब्रेक दाबून बस थांबवली आणि मुलाचा जीव वाचला. यामध्ये चिमुकल्याला दुखापत झाली आहे.
७ नोव्हेंबरची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. अमरेलीहून सूरतच्या दिशेने येणारी 'रौनक ट्रॅव्हल्स'ची बस नॅशनल हायवे-४८ वरून किम परिसरातून जात होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, बसचा दरवाजा उघडा आहे आणि चालक आपल्या जागेवर बसून गाडी चालवत आहे. याच दरम्यान, बसमधील एका महिलेचा लहान मुलगा चालकाच्या शेजारील सीटवर येऊन बसतो.
चालकाची नजर जशी त्या मुलावर पडते, तो त्याला मागे जाण्यास सांगतो. परंतु, पुढच्याच क्षणी असं काही घडतं की तिथे उपस्थित लोकांना मोठा धक्का बसतो. मुलगा अचानक चालत्या बसमधून खाली पडतो. हे पाहताच चालक तात्काळ ब्रेक दाबून बस थांबवतो. मुलाची आई आणि तिच्यासोबत असलेला दुसरा मुलगा प्रचंड घाबरून ओरडू लागतात. आई ताबडतोब बसमधून खाली उतरते आणि रस्त्यावर पडलेल्या आपल्या चिमुकल्याला उचलून सुरक्षित घेऊन येते.
समोर आलेया हा अपघात ७ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्यांची बस अमरेलीहून सूरतच्या दिशेने येत होती. त्यावेळी वाहनात चार प्रवासी उपस्थित होते, ज्यात एक महिला, एक पुरुष आणि त्यांची दोन मुलं होती. बस किम परिसरातून जात असताना दोन्ही मुलं आत खेळत होती. याच दरम्यान त्यातील एक मुलगा खेळत-खेळत पुढे गेला आणि दरवाज्याशी पोहोचला. त्यानंतर अचानक त्याचा तोल गेला आणि तो चालत्या बसमधून खाली पडला.
मुन्ना भाईंनी असाही दावा केला की, घटनेच्या वेळी मुलाची आई सतत मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होती. दुसरीकडे, दोन्ही मुलं बसमध्ये खेळत होती. आईचं लक्ष मुलांच्या हालचालींवर नव्हतं आणि याच दरम्यानच लहान मुलगा पुढे पोहोचल्याचं सांगण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, मुलगा काहीच क्षणात बसच्या दरवाज्यातून खाली पडतो. चालकाने जर वेळेवर सतर्कता दाखवली नसती आणि तात्काळ बस थांबवली नसती, तर परिस्थिती आणखीनच गंभीर झाली असती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला.