एकाच कुटुंबातील आठ चिमुकल्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य सात मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक आठही मुलांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकं या चिमुकल्यांसोबत काय घडलं? त्यांनी कोणता पदार्थ खाल्ला होता? विषबाधेचं कारण काय? जाणून घेऊया या घटनेचा सविस्तर तपशील...
रोजगारासाठी आई-वडील परजिल्ह्यात गेलेले आणि घरात सांभाळणारे वृद्ध नातेवाईक गुरांना चरण्यासाठी बाहेर पडलेले. अशातच शेताच्या बांधावर खेळताना नकळत एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ चिमुकल्यांना गंभीर अन्न विषबाधा झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील मोडलगाव येथे घडली. या विषबाधेत चार वर्षांच्या एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विषबाधा झालेल्या बालकांमध्ये पाच मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील मोडलगाव येथील काही मजूर कुटुंबे रोजगारासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतरित झालेली आहेत. त्यामुळे घरातील लहान मुले वयोवृद्ध नातेवाईकांच्या छत्रछायेखाली गावात राहत होती. घटनेच्या दिवशी वृद्ध नातेवाईक नेहमीप्रमाणे घरासमोरील गुरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. याच दरम्यान घराजवळील आणि शेताच्या बांधावर खेळत असलेल्या बालकांनी तेथे उपलब्ध असलेल्या एरंडीच्या झाडाच्या बिया खाल्ल्या. बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच बालकांना उलट्या, मळमळ आणि त्रास सुरू झाला.
नातेवाईकांच्या आणि ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सर्व आठ चिमुकल्यांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान निर्मला बिज्या वळवी (वय ४ वर्षे) या चिमुकलीचा मृत्यू झाला. धडगाव ग्रामीण रुग्णालयात सध्या सात बालकांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या सात बालकांपैकी एका बालकाची प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्याला तातडीने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
उपचार सुरू असलेल्या बालकांची नावे: सुंदर कुवरसिंग वळवी (वय ३ वर्षे) विवेक पिंट्या वळवी (वय ४ वर्षे) जिंता सुभाष वळवी (वय ३.५ वर्षे) विकी धनवरसिंग पाडवी (वय ३ वर्षे) किरण सुभाष वळवी (वय २.५ वर्षे) मनोज बिज्या वळवी (वय ५ वर्षे) पंकिता इसऱ्या पवार (वय ४ वर्षे) निर्मला बिज्या वळवी (वय ४ वर्षे, मयत)