सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत? पाहा एका तोळ्याचा ताजा भाव!
भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले होते. मात्र आता सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे लग्नसराई, सण किंवा इतर शुभकार्यांसाठी सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत होते. मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या किमतीत प्रति तोळा तब्बल २१८० रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख ३९ हजार ८०० रुपयांवर आला आहे.
सोन्याच्या दरात झालेली ही घट ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः लग्नासाठी दागिने बनवण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबांना या घसरणीचा फायदा होऊ शकतो. सोन्याचे दर आणखी कमी होणार का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र कोणताही मोठा बदल झालेला नाही. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या १०० ग्रॅम चांदीचा दर २० हजार रुपये इतका आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, मागणी आणि पुरवठा यांसारख्या कारणांमुळे सोने चांदीच्या किमती बदलू शकतात.