चटपटीत पाणीपुरीने घात केला! एकाच वेळी १५० जणांची प्रकृती बिघडली
चटपटीत पाणीपुरीने घात केला! एकाच वेळी १५० जणांची प्रकृती बिघडली
img
Nandini khandare More
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेणे अनेकांना आवडते; मात्र पाणीपुरी खाणे काही जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल १५० जणांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी ही घटना कुठे घडली आणि विषबाधेचे कारण काय, जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये दिवाळीदरम्यान फूड पॉयजनिंगची ही गंभीर घटना समोर आली आहे. खेसरहा पोलीस स्टेशन हद्दीतील कलनाखोर पेडारी आणि आसपासच्या गावांमध्ये एका स्टॉलवर पाणीपुरी खाल्ल्यानंतर १५० हून अधिक लोकांची प्रकृती बिघडली. उलटी आणि मळमळ, अतिसाराच्या तक्रारीनंतर लहान मुलांसह ३० हून अधिक जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

आरोग्य विभाग आणि प्रशासनाचं पथक तातडीने सतर्क झालं असून प्रभावित गावांमध्ये मेडिकल कॅम्प लावून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांनी माहिती देताना सांगितलं की, आतापर्यंत ३० ते ३३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये १८ लहान मुलांचा समावेश असून त्यांना बालरोग अतिदक्षता विभागात (PICU) ठेवण्यात आलं आहे. याशिवाय १५ रुग्ण १५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरी खाल्ल्यानंतर दोन दिवसांनी अचानक लोकांना खूप उलट्या, अतिसार आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यात २३ रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, परंतु वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आता सर्वांची प्रकृती ठीक आहेत. मात्र अद्यापही रुग्णवाहिका आणि इतर वाहनांतून नवीन रुग्ण रुग्णालयात येत आहे. सण-उत्सव आणि जत्रांच्या काळात खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group