नेपाळमधील जगप्रसिद्ध माउंट एव्हरेस्ट परिसरात एक भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची हवेतच जोरदार धडक झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हेलिकॉप्टरची धडक कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसराजवळ दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ एकाच ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्दैवी टक्कर झाली. या घटनेमुळे नेपाळच्या पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेपाळच्या सोलुखुंबू जिल्ह्यातील बर्फाळ प्रदेशात हा अपघात घडला. एव्हरेस्ट परिसरात उतरण्याचा प्रयत्न करत असताना दोन लहान हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून कोसळल्याची माहिती पोलिसांनी एएफपीला दिली. या अपघातात एका परदेशी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. "एका परदेशी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आणि एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे," अशी माहिती सोलुखुंबू जिल्हा पोलीस प्रभारी नवीन राजा बुधाथोकी यांनी दिली. मृत्यू झालेला नागरिक भारतीय असल्याचे समजतेय
व्हिडिओमध्ये दिसलेले भयानक दृश्य अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला आहे. त्यात लोक हेलिकॉप्टर उतरण्याची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. अचानक दोन हेलिकॉप्टर आले आणि त्यांची टक्कर झाली. या धडकेमुळे दोन्ही हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आणि ती जमिनीवर कोसळली. त्यामुळे जवळ उभ्या असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली.
अपघात कसा घडला? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही छोटी हेलिकॉप्टर एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. नेपाळमध्ये पर्यटक, गिर्यारोहक, रसद आणि आपत्कालीन परिस्थितीत लहान हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नेपाळची भौगोलिक परिस्थिती आणि प्रतिकूल हवामानात ही हेलिकॉप्टर उडवणे आव्हानात्मक असू शकते. बीबीसी नेपाळीच्या वृत्तानुसार, एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळील फेरिचे गावात सकाळी ८.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टी या कंपन्यांचे हेलिकॉप्टर एकाच ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा अपघात झाला.