पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, डॉक्टर, रुग्ण आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेली चाळीस वर्षाहून अधिक हृदयविकारांवर उपचारांचा प्रदीर्घ अनुभव असणारे, कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष व पुण्यातील ज्येष्ठ व प्रथितयश हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष (एम. एस.) हिरेमठ (वय, ७५, रा. सोपान बाग) यांचे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. हृदयविकार उपचारांचा गाढा वैद्यकीय अनुभव असलेला हृदयरोगतज्ञ हरपल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. हिरेमठ यांनी चार दशकांहून अधिक काळ हृदयरोग निदान आणि उपचार केले. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमधील त्यांचा अनुभव, तसेच हृदयविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी केलेले प्रयत्न यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांची एक ओळख आहे. डॉ. हिरेमठ यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस, एमडी आणि कार्डिऑलॉजीमधील डीएम ही पदव्युत्तर पात्रता प्राप्त केली. १९८२ मध्ये पुण्यातील जोशी हॉस्पिटलमधून त्यांच्या हृदयरोग उपचार क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी रुबी हॉल क्लिनिकसह पुण्यातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये काम केले. रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डिअॅक कॅथलॅबचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांनी ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि एक लाखांहून अधिक अँजिओग्राफी केल्या होत्या. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवरील उपचार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हृदयविकारांचे लवकर निदान या क्षेत्रांतही त्यांनी काम केले.