राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु असून आता भाजप मधून एक मोठी बातमी समोर आली आह. भाजपच्या एका बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाजपच्या विचारधारेशी जनसंघाच्या काळापासून जोडलेले असलेले ज्येष्ठ नेते, माजी पंचायत समिती प्रधान आणि लसानी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चिरंजीलाल टांक यांनी तब्बल पाच दशकांच्या राजकीय प्रवासानंतर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे राजसमंद जिल्हाध्यक्ष जगदीशचंद्र पालीवाल यांच्याकडे पाठवला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून संघटना आणि सत्तेतील नेत्यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी राजीनाम्यात केला आहे.
चिरंजीलाल टांक यांच्या म्हणण्यानुसार, ते गेल्या ५० वर्षांपासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. त्यांनी १९९५ ते २००० या काळात लसानीचे सरपंच, २००० ते २००३ या काळात भाजपचे संयुक्त देवगड मंडळाध्यक्ष, तर २००५ ते २०१० या काळात देवगड पंचायत समितीचे प्रधान म्हणून काम केले. या काळात त्यांनी परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी योगदान दिले.
चिरंजीलाल टांक यांनी स्थानिक नेतृत्व आणि पक्षातील काही नव्या कार्यकर्त्यांकडून वारंवार आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाच ते सात दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्यासाठी 'गद्दार' आणि 'दारुडा' यांसारख्या अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला होता. तसेच, त्यांना पक्षातून बाहेर काढण्याबाबत किंवा त्यांनी राजीनामा देण्याबाबतही वक्तव्ये करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकारामुळे आपला सार्वजनिक अपमान झाल्याची भावना व्यक्त करत टांक यांनी २४ ऑक्टोबर रोजी जड अंतःकरणाने पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आपल्या राजीनामापत्रात चिरंजीलाल टांक यांनी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, दिवंगत हरिओम सिंह राठोड, दिवंगत किरण माहेश्वरी तसेच नंदलाल सिंघवी, बंसीलाल खटीक आणि मांधाता सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासाची आणि मार्गदर्शनाची आठवण करून दिली आहे. त्यांच्या राजीनामापत्राची प्रत जयपूर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे.