टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी  मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई ! दोघांच्या मुसक्या आवळल्या
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई ! दोघांच्या मुसक्या आवळल्या
img
Nandini khandare More

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असतानाच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे गोळीबार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येते आणि या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग कामाला लागला आहे. मुंबई पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत अवघ्या 17 तासात दोन संशियत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे दोन्ही आरोपी गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या दोन्ही संशियतांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकशीत काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई पोलिसानी सुरत एक्सप्रेसमधून दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करून तिन्ही आरोपी सुरतच्या दिशेने रवाना झाल्याचा पोलिसांना संशय होता. हे आरोपी गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची टीप मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, ताब्यात घेतलेले आरोपी तेच आहेत की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही. यातील एक आरोपी हा महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जात आहे.

टायगरवर गोळीबार करण्याआधी आरोपींनी काही ठिकाणांची रेकी केल्याचंही उघड झालं आहे. टायगरचे घर आणि फुटबॉल मैदानाचीही रेकी करण्यात आली होती. त्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. कोटा पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफ याच्या कार्टर रोड येथील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तूल वापरल्याचा संशय आहे. फॉरेन्सिक विभागाच्या प्राथमिक तपासणीत गावठी पिस्तुल म्हणजेच (कॉपी पीस) मधून फायरिंग केल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी एकूण सात ते आठ गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, तर दोन गोळ्यांचे लक्ष्य चुकलं, अशी माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group