रेल्वेत नोकरीच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी सामोर आली आहे. भारतीय रेल्वेने एनटीपीसी ग्रॅज्युएट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ३५४८ पदं भरली जाणार आहेत. तिकीट सुपरवायझर, सिनिअर क्लर्क, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि ज्युनिअर अकाऊंट्स असिस्टंट कम टाइपिस्ट या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
रेल्वेने या भरती प्रक्रियेसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ८ ऑक्टोबरपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. http://www.rrbapply.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये सर्वात जास्त २७५० पदं गुड्स ट्रेन मॅनेजरची आहेत. रेल्वेच्या या सर्व पदांवर ज्यांची निवड होणार आहे त्यांना पगार देखील चांगला मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी. उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण/EWS उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९४ पूर्वी झालेला नसावा, OBC नॉन-क्रिमी लेयर उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९१ पूर्वी झालेला नसावा आणि SC/ST उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९८९ पूर्वी झालेला नसावा, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया ही सीबीटी १, सीबीटी २, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, गुणवत्ता यादी यानुसार केली जाणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ५०० रुपये फी द्यावी लागेल. अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांना २५० रुपये फी द्यावी लागेल. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला मूळ वेतन किती मिळणार याची देखील माहिती समोर आली आहे. - तिकीट सुपरव्हायझर - ३५,४०० रुपये -गुड/ ट्रेन मॅनेजर- २९,२०० रुपये - कनिष्ठ लेखा सहाय्यक / टंकलेखक - २९,२०० रुपये - वरिष्ठ लिपीक सहाय्यक / टंकलेखक - २९,२०० रुपये