महाविद्यालयाच्या लिफ्टमध्ये अडकली विद्यार्थिनी  ! तब्बल १४ तासांनी  सुटका; नेमकं काय आणि  कुठे  घडलं?
महाविद्यालयाच्या लिफ्टमध्ये अडकली विद्यार्थिनी ! तब्बल १४ तासांनी सुटका; नेमकं काय आणि कुठे घडलं?
img
Nandini khandare More
कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकून राहण्याची वेळ आली. पुण्यातील नामांकित महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला. १९ वर्षीय विद्यार्थिनी लिफ्टमध्ये अडकल्याची घटना समोर आल्यानंतर कॉलेज प्रशासनाच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, रात्रभर तिचा शोध सुरू असतानाही ती महाविद्यालयाच्या इमारतीतील लिफ्टमध्ये असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. अखेर गुरुवारी सकाळी लिफ्ट सुरू झाल्यानंतर तिची सुटका झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लेक्चर संपल्यानंतर विद्यार्थिनी लिफ्टने जात होती. त्यावेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट बंद पडली. त्यामुळे ती आतच अडकली. बाहेर पडण्यासाठी तिने दरवाजा ठोठावला आणि आरडाओरड करून मदत मागितली. मात्र, तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. मोबाईलला नेटवर्क नसल्याने तिला कोणाशीही संपर्क साधता आला नाही.

मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकांकडे चौकशी आणि परिसरात शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. अखेर मध्यरात्री पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीस, महाविद्यालयीन कर्मचारी आणि कुटुंबीयांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, ज्या परिसरात शोध सुरू होता, त्याच इमारतीतील लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली होती. गुरुवारी सकाळी लिफ्ट नेहमीप्रमाणे सुरू झाल्यानंतर तब्बल १४ तासांनी तिची सुटका झाली.

या घटनेनंतर महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था, लिफ्टची देखभाल आणि आपत्कालीन मदत यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महाविद्यालय प्रशासनाने घटनेची दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. संबंधित परिसरात वीजपुरवठा पाच ते सहा वेळा खंडित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तांत्रिक कारणांसह सर्व बाबींची चौकशी केली जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group