सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा असलेल्या दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आधी गोकुळ दूध संघाने दरवाढ जाहीर केल्यानंतर आता वारणानेही दूध उत्पादक आणि ग्राहकांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारणाच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याने ग्राहकांना आता दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
वारणा दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दूध उत्पादकांना दिलासा देतानाच ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे
वाढता पशुखाद्य खर्च, जनावरांचे संगोपन, पशुवैद्यकीय सेवा आणि इतर उत्पादन खर्चाचा विचार करून दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वारणा दूध संघाने दिली आहे. म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गाय दूध विक्री दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढता पशुखाद्य खर्च, जनावरांचे संगोपन आणि दूध उत्पादनाचा खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे.
वारणा दूध संघाची दूध दरवाढी संदर्भात संघाकडून दराचे परिपत्रक जारी करण्यात आले असून शनिवारपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
गोकुळ दूध संघाच्या प्रशासकीय काळातील तोटा भरून काढण्यासाठी गोकुळ दूध संघाने इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दूध दरवाढ केली. म्हशीच्या दरामध्ये 6 रुपये तर गाईच्या दरामध्ये 4 रुपये विक्रीमध्ये वाढ केली आहे. प्रशासक काळामध्ये गोकुळ संघाला 28 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये होणारी दुधाची टंचाई यामुळे गोकुळ दूध संघाकडून दरवाढ केल्याचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले.