नाशिक :नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे मृत्यूचा थरार अनुभवायला मिळाला. मालेगावहून भिवंडीच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या मोठ्या दरडीवर जोरात आदळला. या भीषण अपघातात ट्रकचा वाहक शेख महोम्मद मुनाफ कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकमधून प्रवास करणारे ११ जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ट्रक दरीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहन दरडीच्या दिशेने वळविल्याने मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा घटनास्थळी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथून सिमेंट घेऊन एमएच ४३ बीएक्स २४२४ क्रमांकाचा ट्रक भिवंडीच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान चालकाने मालेगाव महामार्गावरून कल्याण आणि भिवंडी येथे जाणाऱ्या काही प्रवाशांना ट्रकच्या केबिनमध्ये बसवले होते. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ट्रक कसारा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दरडीवर जाऊन आदळला. या अपघातात ट्रकचा वाहक शेख महोम्मद मुनाफ कुरेशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर शबान अब्दुल शेख (४५), शकील खलील शेख (१९), जकिरा करीम सय्यद (६५), अफसाना सय्यद (३६), वसीम करीम सय्यद (४३), अलिशा सय्यद (२०), महोम्मद सय्यद (८४), वारीस सय्यद (८४), मुस्कान सय्यद (११), अनम अन्सारी (३५) आणि शकील अन्सारी (३०) हे ११ प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी कल्याण आणि भिवंडी परिसरातील रहिवासी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, कसारा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि घोटी महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हवालदार चौधरी, बोरकर यांच्यासह सुनील करवर, नंदू जाधव, शाम धुमाळ, दत्ता वाताडे आणि लक्ष्मण वाघ यांनी बचावकार्यात सहभाग घेतला. अपघातग्रस्तांना ट्रकमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनीही मदतीचा हात पुढे केला. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका गंभीर जखमीला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या वेळी कसारा घाट उतरत असताना चालकाला डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ट्रक नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन दरीच्या दिशेने न वळवता दरडीच्या दिशेने वळवले. त्यामुळे ट्रक दरडीवर आदळला. चालकाने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे ट्रक थेट खोल दरीत कोसळण्याचा संभाव्य धोका टळल्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निखिल लसने आणि महामार्ग पोलीस केंद्राचे राम होंडे करीत आहेत.