दिवाळीच्या सणाचा आनंद सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ऐन सणासुदीच्या काळात दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
समोर आलेल्या माहितीनुसार , अनिल भागुजी भदादे (वय 49) आणि तुकाराम दामू येले (वय 47) अशी बेपत्ता व्यक्तींची नावे आहेत. गुरुवारी दुपारपासून दोघांचा शोध सुरू असून, शुक्रवारी दिवसभर शोधमोहीम राबवूनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे सांजेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
गुरुवारी दुपारी अनिल भदादे आणि तुकाराम येले हे दोघे मुकणे धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान धरणाच्या काठावर दोघांचे कपडे आणि काही वैयक्तिक वस्तू आढळून आल्या. त्यामुळे दोघेही धरणाच्या पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती तातडीने वाडीवऱ्हे पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच आमदार हिरामन खोसकर यांनी मुकणे धरण परिसरात धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सुरू असलेल्या शोधमोहिमेचा आढावा घेतला. तसेच संबंधित यंत्रणांना शोधकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिक, पोलीस कर्मचारी आणि अनुभवी पाणबुड्यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यात दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.
शुक्रवारी सकाळपासून पाणबुड्यांनी धरणाच्या पाण्यात शोधमोहीम सुरू केली होती. दिवसभर अथक प्रयत्न करूनही दोघांचा शोध लागला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. मात्र, अंधार पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघेही अद्याप बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. परिसरातील नागरिकही शोधकार्याकडे लक्ष ठेवून आहेत.