गांधीनगरमागे मनोरुग्ण युवकाचा मृत्यू; लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा नातेवाइकांचा आरोप
गांधीनगरमागे मनोरुग्ण युवकाचा मृत्यू; लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा नातेवाइकांचा आरोप
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : गांधीनगर परिसरामागील राहुलनगर येथे एका ४१ वर्षीय मनोरुग्ण युवकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

प्रदीप उर्फ सोनू कैलास भालेराव (रा. समतानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते, अशी माहिती त्याच्या जवळच्या मित्रांनी  दिली. घटनेदरम्यान युवकाने एका व्यक्तीला पकडल्याने घाबरलेल्या नागरिकांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याचे फटके बसल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

सोनू उर्फ प्रदीप हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने परिसरात फिरत असताना काही वेळा त्याच्याकडून इतरांना त्रास होण्याचे प्रकार घडत असत, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. रविवारी सायंकाळी तो राहुलनगर परिसरात गेला असता, तेथे जमीर नावाच्या व्यक्तीला त्याने पकडून ठेवल्याची घटना घडली.

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. जमीरची सुटका करण्यासाठी काही नागरिक पुढे सरसावले. याचवेळी झालेल्या झटापटीत प्रदीपला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

वेळीच पोलिसांना कळविण्याची गरज होती.....

प्रदीपच्या जवळच्या मित्रांनी, स्थानिक रहिवाशांनी आणि नातेवाइकांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रदीप हा मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. त्याच्याकडून एखाद्या व्यक्तीला त्रास झाला असेल, तर त्याबाबत पोलिसांना कळवून योग्य ती मदत घेता आली असती.

मात्र, त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करणे आणि डोक्यावर फटके मारणे ही बाब गंभीर असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. या मारहाणीमुळेच प्रदीपचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीशी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संयमाने वागणे आवश्यक असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी जमीर आणि त्याचा भाऊ शकील शमशुद्दीन शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि मृत्यूचे कारण याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group