बंद घर फोडून चोरी; २४ तासांत दोघे जेरबंद; उपनगर पोलिसांची कामगिरी
बंद घर फोडून चोरी; २४ तासांत दोघे जेरबंद; उपनगर पोलिसांची कामगिरी
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-घर बंद असल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या टोळीचा उपनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस  तासांत छडा लावला. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना  अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, टीव्ही, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

आनंद रमेश धिवरे हे पत्नीसमवेत गुजरात येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. लॅपटॉप विक्रीच्या प्रयत्नात पोलिसांच्या जाळ्यात

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, पोलिस पोलीस उपनिरीक्षक शशिकांत  पवार व अंमलदार जयंत शिंदे यांना चोरीचा लॅपटॉप विक्रीसाठी दोन संशयित विजय-ममता सिग्नल परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहून संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिस पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या लॅपटॉपबाबत चौकशी केली असता, त्यांनी एलआयजी सोसायटी परिसरात चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्या संशयितांची नावे मयूर विजय सोनवणे (२०, रा. राहुलनगर, विजय-ममता सिग्नल परिसर) आणि कमलेश प्रदीप केदारे (१९, रा. एलआयजी सोसायटी, शिवाजीनगर, नाशिक) अशी आहेत. त्यांच्यासोबत सौरभ साटोटे आणि एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून डेल कंपनीचा लॅपटॉप, कॅनन प्रिंटर, संगणक मॉनिटर, पॅनासोनिक टीव्ही, सोन्याचे कानातले, चांदीचे दागिने, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी मूर्ती, गॅस सिलिंडरची टाकी, पंप, इस्त्री, व्हिडिओ इंटरकॉम किट आणि इतर साहित्य अशा एकूण २६ वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group