नाशिक, दि. 22 ऑक्टोबर :सप्तशृंगी गड येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वाहन प्रवेशबंदीच्या कालावधीत बदल केला आहे. त्यानुसार नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता इतर भाडोत्री वाहने, ऑटोरिक्षा तसेच सर्व प्रकारच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांना 23 ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक येत असून २३ ऑक्टोबरपासून भाविकांच्या गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. घाट रस्ता अरुंद व वळणावळणाचा असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, या दृष्टीने प्रवेशबंदीच्या कालावधीत सुधारणा करण्याची विनंती स्थानिक परिस्थितीचा विचार करून करण्यात आली होती.
अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून यासंदर्भातील आदेशात अंशतः बदल केला आहे. यापूर्वी दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू करण्यात आलेली प्रवेशबंदी सुधारित करून २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून लागू करण्यात आली आहे.
हा निर्बंध परिस्थितीनुसार शिथिल करण्याचा अथवा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील प्रचलित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सुधारित वाहतूक निर्बंधांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच प्रवासाचे नियोजन करताना या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजपूत यांनी केले आहे.