द्वारका परिसरात पहाटे दोन हजार किलो स्पेशल स्वीट बर्फीचा साठा जप्त
द्वारका परिसरात पहाटे दोन हजार किलो स्पेशल स्वीट बर्फीचा साठा जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक : नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत आज पहाटे नाशिकच्या द्वारका परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई केली. गुजरातहून नाशिक शहरात अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेला 5 लाख 58 हजार 267 रुपये किमतीचा २,१५५ किलो स्पेशल स्वीट बर्फीचा साठा दोन खासगी बसमधून जप्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत निर्धारित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. अस्वच्छ वातावरणात साठवणूक व वाहतूक, विनापरवाना बसमधून वाहतूक तसेच निर्धारित तापमानाच्या अटींचे पालन न केल्यामुळे संबंधित साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर हा साठा नष्ट करण्यात आला.

ही कारवाई सह आयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त विनोद धवड आणि सहायक आयुक्त संदिप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोंविदा गायकवाड, सुहास मंडलिक, संकेत येलमामे, वैभव गर्दे, चेतन परदेशी, अक्षय गाडेकर, अश्वीनी पाटील आणि ऋतुजा नवले यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group