नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. दरम्यान दहाव्या मैलाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलाजवळ हॉटेल अमृत पंजाब आणि गरवारे पॉईंट परिसरात आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी घसरल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
धनंजय कुमार ठाकूर (रा. ओझर टाऊनशिप) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. ठाकूर हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळी कामावर जात असताना हा अपघात घडला. रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम आणि त्यामुळे झालेली वाहतुकीची प्रचंड गुंतागुंत यामुळे एका कामगाराच्या जीवावर बेतली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.