नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेचे बनावट दस्त तयार करून त्यावर बनावट शिक्क्याचा वापर करून फिर्यादी यांची खोटी सही करून फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन बाबूराव ठाकरे (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी भूषण गमनराव शेवाळे (रा. निकुंज अपार्टमेंट, गंगापूर रोड, नाशिक), अमोल एन. बिडवे, अश्विनी एस. गायकवाड, बनावट एमओयू नोटरिंग करून देणार्या नोटरी व ए. आय. शेख अशा पाच जणांच्या संगनमताने मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक या संस्थेचे बनावट दस्त तयार करून त्यावर बनावट शिक्क्यांचा वापर करून त्यावर फिर्यादी यांच्या संमतीशिवाय फोटो लावून त्यांची खोटी सही करून खोटे नोटरीचे दस्त खरे आहेत, असे भासविले, तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्याकडे सिक्युरिटायझेशन केस नंबर ५२७/२०२४ अन्वये दिलेल्या निकालाचा बनावट आदेश तयार करून आरोपींनी उत्कर्ष मधुकर जाधव व मधुकर मुरलीधर जाधव यांच्यासारख्या इतर लोकांची संस्थेच्या नावे बनावट दस्त तयार करून आर्थिक फसवणूक केली आहे.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.