नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : दत्त मंदिर ते बिटको चौकादरम्यान असलेल्या महावितरणच्या विद्युत भवन या विभागीय कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉलमधील असंख्य कागदपत्रे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड अग्निशमन केंद्राच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. कार्यालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महावितरणच्या विद्युत भवन या मुख्य इमारतीमध्ये सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या इमारतीत मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या दालनाच्या मागील बाजूस कार्यालयीन बैठका घेण्यासाठी मोठा कॉन्फरन्स हॉल आहे. आज सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास या कॉन्फरन्स हॉलमधून धूर निघताना दिसला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि हॉलमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या.
दरम्यान, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामावर येण्याची लगबग सुरू असतानाच हा प्रकार घडला. हॉलमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने नाशिक रोड येथील अग्निशमन केंद्राला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत कॉन्फरन्स हॉलमधील असंख्य कागदपत्रे जळून खाक झाल्याचे समजते. कार्यालयीन वेळ सुरू होण्यापूर्वीच आग लागल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, कार्यालयीन कामकाज सुरू होण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महावितरणच्या विद्युत भवन परिसरात खळबळ उडाली. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.