त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न करतो असे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून ओळख असलेल्या २९ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे तिने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
बारामती तालुक्यात राहणाऱ्या पीडितेच्या भावाने २४ सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याच्या २९ वर्षीय बहिणीसह सहा वर्षांच्या भाचीचे अपहरण केल्याची फिर्याद नोंदवली होती. या तक्रारीवरून सुरुवातीला संशयित राहुल साळुंखे आणि बाकेराव ढेमसे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पीडित महिला आपल्या काकाकडे आली होती. ते तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेले.
तेथे दिलेल्या जबाबत तिने म्हटले आहे की ती आणि साळुंखे हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. तो तेव्हा पासून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. पीडित महिलेने इंदिरानगर पोलिसांकडे नोंदवलेल्या नव्या जबाबानंतर या गुन्ह्यात शारिरीक शाेषण, लग्नाचे खाेटे आमिष अशी अतिरिक्त कलमे वाढवण्यात आली आहेत.
पाथर्डी शिवारातील ह.भ.प. असलेला राहुल साळुंखे सध्या पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.