नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- भालेराव मळा परिसरातील जय भवानी रोड येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सलमा इस्माईल शेख यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रिज, कपाट तसेच रोख रक्कम सह सोन्याचे दागिने जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत घरातील तीन गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, घराजवळ जाण्यासाठी अरुंद जागा आणि बंबाला येणाऱ्या अडचणींमुळे जवानांना आग विझवताना मोठे प्रयत्न करावे लागले. परिसरात घरे एकमेकांना लागून असल्याने आग शेजारील घरांपर्यंत पसरण्याचा धोका होता. त्यामुळे जवानांनी विशेष खबरदारी घेत इतर घरांना कोणतीही झळ पोहोचू न देता आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीची तीव्रता लक्षात घेता जवानांनी जीवाची पर्वा न करता घरात प्रवेश केला आणि तीन गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
प्रभारी केंद्रप्रमुख आर. डी. सोनवणे, यू. आर. गोडसे, एफ. डी. भालेराव, वाय. जी. पाटोळे, एस. एस. हिरे, वाय. ए. व्यवहारे आणि ओ. ए. मेंड यांनी आग विझविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला.