Nashik : कॉलेजरोडवर
Nashik : कॉलेजरोडवर "या" ठिकाणी एफडीएचा छापा; ५० लाखांचे हेअर ऑइल जप्त
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- टक्कल असलेल्या व्यक्तींना डोक्यावर केस उगवणे व केसांची वाढ होणे या स्वरूपाची जाहिरात फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करून तेलाची विक्री होणार्‍या ठिकाणी औषध व अन्न प्रशासन विभागाने छापा टाकून सुमारे 50 लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.

एफडीएच्या पथकाने विसे मळा येथील सहजीवन कॉलनीजवळ रूपल अपार्टमेंटमध्ये शॉप नंबर 9 येथे व्हीएस न्यू फॅशन झोन या ब्युटी सलून व इमिटेशन व्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी संस्थाचालक योगेश भगत यांच्याकडे आयुर्वेदिक उत्पादनाचा कोणताही परवाना नसल्याचे धक्कादायक वास्तवदेखील समोर आले आहे.

आज काल पडणारे टक्कल, डोक्यावरचे उडणारे केस यामुळे अनेक जण वैतागलेले असतात. त्याचा फायदा घेऊन फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरात करून जास्तीत जास्त नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिक तपास केला असता मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने वरील ठिकाणाहून 999 रुपये किंमत असलेल्या शंभर मिलि तेलाच्या सुमारे 5,040 बॉटल मिळून आल्या असून, त्यांची किंमत 50 लाख 34 हजार 960 रुपये आहे. या बाटल्यांवरती फक्त मार्केटेड बाय व्हीएस न्यू फॅशन एवढाच उल्लेख होता. उत्पादनाच्या बाबत कोणतीही माहिती नव्हती.

अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिक तपास केला असता संचालक योगेश भगत यांच्याकडे आयुर्वेदिक उत्पादन तयार करणे, विक्री करणे या संदर्भातील कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे धक्कादायक वास्तवदेखील समोर आले आहे. केवळ नागरिकांना जाहिरातीच्या माध्यमातून भुलवून त्यांची दिशाभूल करून दर्जा नसलेले तेल विकत असल्याचे समोर आले आहे. टक्कल पडण्याच्या नावावर अशा पद्धतीप्रमाणे फसवणूक केल्याचे समोर आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे.

जप्त केलेले हेअर ऑईल व सलूनमध्ये असलेल्या इतर उत्पादनांचे नमुने साचणीसाठी घेण्यात आले आहेत. या उत्पादनाचा प्रत्यक्ष उत्पादक आणि उत्पादनाबाबत पुढील तपास सुरू असून, तपासात निष्पन्न होणार्‍या बाबीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group