नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर परिसरातील पाच मिठाई उत्पादकांवर धाड घालून अन्न व औषध प्रशासनाने पाचही उत्पादकांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये देवळाली कॅम्प येथील सिर्वी स्वीट्स, भगूर येथील उत्तम फरसाण अॅण्ड स्वीट्स, ओझर बस स्टॅण्डजवळील साई बिकानेर स्वीट्स, तसेच नाशिकमधील अशोका मार्गावरील कृष्णासागर स्वीट्स आणि तिडके कॉलनीतील पंचम स्वीट्स यांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त विनोद धवड, संदीप देवरे व दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी अन्नपदार्थ तयार करताना आणि हाताळताना अस्वच्छता, अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागेत अस्वच्छता, कीटक व झुरळे यांचा प्रादुर्भाव आदी अनियमितता आढळली. त्यामुळे अन्नसुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक, अश्विनी पाटील, प्रतीक भड व ऋतुजा नवले यांनी ही कारवाई केली.
दिवाळीसारख्या सण-उत्सव काळात नागरिकांना स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील, असे सांगण्यात आले.