त्र्यंबकेश्वर :- वाढती गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) मंदिरातील व्ही आय पी दर्शन १० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
पितृपक्ष चालू असल्याने येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक धार्मिक विधींसाठी येतात. आज आणि उद्या लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. यामुळे मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करताना प्रशासनावर ताण येत असून, सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.
गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत ठेवण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दि. ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भात देवस्थान ट्रस्टने एक पत्रक काढले आहे. या पत्रात केंद्र शासन, राज्य शासन अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणार्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहारानुसार असलेल्या अपवादांना हा निर्णय लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भाविकांनी या निर्णयाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.