९ नोव्हेंबर २०२६
चाडेगावला उसाला आग तर विहितगावला भंगार दुकान खाक
नाशिकरोड (चंद्रकांत बर्वे) :- दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने नाशिकरोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चाडेगाव शिवारातील ऊसशेतीला आग लागून सुमारे 15 ते 20 गुंठे ऊस जळून खाक झाला, तर विहितगाव नाक्यावरील भंगार दुकानालाही भीषण आग लागली. या दोन्ही घटनांमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
चाडेगाव शिवारात शिवाजी देवराम वाघ यांच्या शेतात सुमारे एक एकर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. 12 ते 13 महिन्यांचा झालेला हा ऊस तोडणीसाठी तयार होता. लक्ष्मीपूजनानिमित्त परिसरात फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना रॉकेटसदृश फटाक्याची ठिणगी उसाच्या शेतात पडल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उसाच्या खालच्या बाजूला असलेल्या वाळलेल्या पाचटाने पेट घेतल्याने आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले. यामध्ये जवळपास 15 ते 20 गुंठे ऊस जळून खाक झाला, तर शेजारील उसाच्या पिकालाही आगीची झळ बसली. तोडणीसाठी तयार झालेल्या पिकाचे नुकसान झाल्याने वाघ यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजूबाजूच्या शेतकर्यांनी विहिरीच्या पाण्याचा वापर करून अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.
दुसरीकडे, नाशिकरोड येथील विहितगाव नाक्यावर असलेल्या भंगार दुकानाला अचानक भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान दोन बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र भंगार दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे
दिवाळीच्या आनंदोत्सवात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे एका ठिकाणी शेतकर्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे नुकसान झाले, तर दुसर्या ठिकाणी व्यावसायिकाला आर्थिक फटका बसला. त्यामुळे फटाके फोडताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता या घटनांमधून अधोरेखित झाली आहे.
Copyright ©2026 Bhramar